अत्यंत प्राचीन आणि ‘अक्षर’ असलेले सनातन साहित्य व्यक्तिविकासाचा राजमार्ग असून त्याचे संस्कार विद्यार्थीदशेपासून जर झाले तर एक उत्तम सकारात्मक विचाराची पूर्ण विकसित व्यक्ती घडेल, ही धारणा ठेवून हाडाच्या शिक्षक आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांनी लिहिलेला तीन पुस्तकांचा संच नुकताच वाचनात आला. वयाच्या ५५-६०व्या वर्षानंतर वाचावयाचे साहित्य म्हणून रूढ संकल्पनेला नावापासून छेद देणारी ही पुस्तके आहेत.
विद्यार्थ्यांसाठी वेद
.वेद का वाचावेत, अभ्यासावेत, अंगीकारावेत याची कल्पना या पुस्तकात स्पष्ट केली आहे.
प्रत्येक वेद, त्याच्या नावाची व्युत्पत्ती, त्याचे मंत्रद्रष्टे ऋषी, त्यातील विषयांचे वर्गीकरण, मण्डल, सूक्त, ऋचा यांची संख्येसह मांडणी तसेच प्रत्येक वेदाचे वेगळे असे वैशिष्ट्य या सर्वांची माहिती टेबल स्वरूपात पाहावयास मिळते. विद्यार्थी त्यात सहजपणे रमून जाईल आणि प्रत्यक्षात वेदांचा सखोल अभ्यास करण्याकडे, ते जाणून घेण्याकडे त्याची निश्चित मनोवृत्ती बळावेल. विकासाच्या दृष्टीने सर्व आवश्यक अशा विषयांचे सखोल ज्ञान या वेदांमध्ये कसे भरलेले आहे याचे सोप्या भाषेत वर्णन या पुस्तकातून विद्यार्थ्याला निश्चितच प्राप्त होईल.
विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता
विश्वात असलेल्या आणि नसलेल्याही विषयांचा सांगोपांग विचार करणारा, उच्चतम मूल्य, तत्त्व यांना धरून निसर्गाच्या साह्याने 'स्व'सह आजूबाजूच्या सजीवांचाही विचार करत ‘वसुधैव कुटुम्बकम्' म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे ७०० श्लोकांचे महाकाव्य म्हणजे भगवद्गीता. याची ओळख विद्यार्थीदशेपासून प्रत्येकाला असलीच पाहिजे, असे एका तळमळीच्या शिक्षकास वाटणे स्वाभाविक आहे. यातूनच लेखिकेने या पुस्तकाचे लिखाण केलेले दिसते. ‘ _गीता फक्त महाभारत’ या ग्रंथाचा एका भाग नसून जीवन जगण्याचा श्रेष्ठ राजमार्ग कसा आहे हे अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. ‘युद्धस्यकथा रम्या।’ हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि विद्यार्थी त्यात रममाण होतातच हे लेखिका शिक्षणतज्ज्ञ या नात्याने पूर्णपणे जाणून आहे, त्यामुळे त्यांनी हा जीवन विकासाचा राजमार्ग कथारूपात सांगितला आहे._
मूळ श्लोकरूपात, संस्कृत भाषेत असणारी ही ‘भगवद्गीता’ विद्यार्थीदशेत, सोप्या भाषेत, कथा स्वरूपात वाचावयास मिळाली तर विद्यार्थ्यांचा विकास (शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक) या सर्वांगाने निश्चितच होईल यासाठी लेखिकेला असलेली कळकळ आणि त्यासाठी मोठे गहन तत्त्वज्ञान सोप्या, सरळ भाषेत सांगण्याची त्यांची हातोटी ही या पुस्तकाची वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.
गीतेतील अध्याय, त्यांची नावे, त्यांतील श्लोकसंख्या, विषय यांचे विवेचन आहेच, पण प्रत्येक अध्यायाच्या या विवेचनात ‘एक वेगळा विचार करून पाहू’ अशी एक चौकट टाकून विद्यार्थ्यांना जिज्ञासा प्रवृत्तही केलेले आहे. थोडक्यात, प्रकृती, जीव, शाश्वत काळ आणि मानव करीत असलेली सर्व कर्मे यांचा उहापोह यात आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी १८ अध्यायाद्वारे अर्जुनाला जे योग्यायोग्य, न्याय अन्याय यांच्याही पलीकडे जाऊन अर्थात् द्वंद्वातीततचे ज्ञान दिले आणि ‘यतो धर्म: ततो जयः।’ ही शिकवण दिली. याचे वर्णन आहे.
विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वरी
अनेक मार्गदर्शकांनी समाजाला विविध समस्येतून मार्ग दाखवत स्वविकासासह विश्वाचाही विकास कसा घडवायचा हे सोप्या दैनंदिन जीवनातील उदाहरणांनी समजवून सांगितले. त्यामुळे अनेक संत-माहात्म्यांनी आपल्या प्रबोधनातून समाजाला मार्ग दाखवत समाजाचे समस्या निराकरण करत समाजाची धारणा, रचना केली, ज्यात ज्ञानेश्वर माऊलींचे स्थान अगदी वेगळ्या उंचीवर आहे. त्यांनी भगवद्गीता या ७०० श्लोकांचे निरुपण ९००० श्लोकात करून. जगत्वंद्य ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना केली. अशा या महाकाय अक्षर वाङ्मयाची ओळख सोप्या मातृभाषेत, सोदाहरण विद्यार्थ्यांना करून देणे म्हणजे त्यांच्या विकासाला, अंतर्निहित क्षमतांनाच विकसित करणं ठरेल हे लेखिका पूर्णपणे जाणून आहे.
ज्ञान हे लोकभाषेत, बोली भाषेत मांडले तर ते सर्वच प्रकारची देवाण-घेवाण उत्तम प्रकारे आणि सुकर होईल ज्यातून परस्पर विकासाचे एक वेगळे पर्व निर्माण होईल. या विचारानेच माऊलींनी भगवद्गीता या जीवनग्रंथाचे निरूपण मायबोली मराठीतून करत संपूर्ण विश्वासाठी ‘पसायदाना’ची मागणी केली. या ग्रंथ रचनेत आलेल्या विविधांगी व्यक्तिविकासाची संकल्पना अनेक प्रकारे समाजाला समजवून देत समाजहित कसे साधले याचे विवेचन प्रत्येक अध्यायाच्या अंती ‘व्यक्तिविकास करताना/व्यक्तिमत्व घडविताना’ या चौकटीद्वारे केलेले दिसते.
मला वाटते फक्त विद्यार्थ्यांच्याच नव्हेतर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक पैलू कोणते याची चर्चा पुस्तकाच्या प्रकरणात आहे. ज्याला व्यक्तिमत्त्व विकासाची आणि त्याचबरोबर कुटुंब, समाज आणि राष्ट्रविकासाची तळमळीने आस आहे त्या सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, अभ्यासावे इतकेच नव्हेतर जरूर संग्रही ठेवावे.
एका गढुळलेल्या संस्कारहीन परिस्थितीत भारतीय समाजाला भरकटू न देता विद्यार्थीदशेपासून संस्कारक्षम वैचारिक खाद्य पुरविण्यासाठी ही तीनही पुस्तके उत्तम मार्गदर्शक ठरतील. त्यासाठी लेखिकेने निवडलेल्या या विषयांबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! अशा विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सकाळ प्रकाशनाला धन्यवाद!