दिवस नववा "सिद्धिदा"

By Sakal Publications · · 3 min read

दिवस नववा "सिद्धिदा"
आज नवरात्रीचा नववा दिवस! महानवमी! या दिवशी नवदुर्गांपैकी 'सिद्धिदा' या देवीच्या नवव्या स्वरूपाचे पूजन करतात. सिद्धिदा म्हणजे 'सिद्धी प्रदान करणारी'. तिला 'सिद्धिदात्री' असेही म्हणतात. दा किंवा दात्री म्हणजे देणारी. सृष्टिरचनेच्या वेळी ब्रह्मदेवांना काही प्रश्न पडले होते.त्यासाठी त्यांनी शंकरांची मदत मागितली.त्यावेळी सृष्टिनिर्मिती कार्याच्या सुकरतेसाठी, सुलभतेसाठी भगवान शंकरांनी आदिशक्तीची आराधना केली.भगवान शिवांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन पराशक्ती सिद्धिदात्रीच्या दिव्य स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि कृपाशीर्वाद स्वरूपात तिने शिवांना अष्ट सिद्धी प्रदान केल्या.अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, ईशिता आणि वशिता ह्या त्या अष्टसिद्धी होत. या अष्ट सिद्धींच्या प्रभावाने भगवान शंकरांचे अर्धे शरीर नारीस्वरूप झाले व अर्धे शंकरांचे राहिले,आणि तेव्हापासून 'अर्धनारी नटेश्वर' या नावाने ते प्रसिद्ध झाले.अर्धनारी नटेश्वर या रूपात शिवशक्तींचे मीलन झाले. या घटनेनंतर ब्रह्मदेवांच्या सृष्टिनिर्मितीच्या कार्याला चालना, प्रेरणा मिळाली. ह्या कथेचा मथितार्थ असा की, निसर्गात पुरुष म्हणजे शिव आणि स्त्री किंवा प्रकृति म्हणजे शक्ती या दोन्हींचे संतुलन आणि सामंजस्य अत्यंत आवश्यक आहे.शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत असे म्हटले जाते. 'शिव' या शब्दातील इकार काढला तर तो शब्द 'शव' होतो.

आपण अनेक पौराणिक कथांमधून नेहमी वाचतो, कधी शक्ती म्हणजे पार्वती शिवप्राप्तीसाठी तप करते तर कधी शिव,शक्तीची उपासना करतात. प्रत्यक्ष आद्य शंकराचार्य त्यांच्या
श्रीदेव्यपराधक्षमापन स्तोत्रात लिहितात, 'हे भवानी माते, ज्या भगवान शिवशंकरांचे चिताभस्म हेच शरीर विलेपन आहे. विष हेच भोजन आहे. दिशा याच वस्त्र आहेत. ज्यांनी मस्तकावर जटा धारण केल्या आहेत, गळ्यात महाभुजंग वासुकीची माला आहे. नंदीबैल हे ज्यांचे वाहन आहे. अशा पशुपति शंकरांनी हातात भिक्षापात्र म्हणून मनुष्य कवटी धारण केली आहे.भूतगणांचा अधिपती असूनही त्यांना 'जगदीश, विश्वनाथ,महेश्वर 'ह्या श्रेष्ठ उपाध्यांनी गौरवले जाते हे केवळ तुझ्या
पाणिग्रहणाचेच फळ आहे.' स्त्रीशक्ती आणि स्त्रीमुक्तीचे याच्याहून मोठे उदाहरण आजच्या आधुनिक काळातही अस्तित्वात नाही. शिव आणि शक्ती यांची समरसता हे सृष्टीचे पूर्णत्व आणि सामर्थ्य आहे.

प्रत्यक्ष देवांचा देव महादेव असलेल्या शिवांना वर देणारी,आणि पुन्हा त्यांच्या स्वरूपात एकरूपही होणारी अशी ही सिद्धिदात्री देवी चतुर्भुजा आहे. सिद्धिदात्री देवीचा वर्ण जांभळा आहे. तिच्या हातात डमरू, त्रिशूल आहेत आणि उरलेल्या दोन्ही हातांनी ती अभय आणि वर देत  आहे.ती वृषभासना असली तरी युद्धप्रसंगी सिंहावर बसते.सिद्धिदा देवीच्या सभोवती सिद्ध, यक्ष,गंधर्व, देवता असतात आणि ते तिची पूजा करत असतात असे वर्णन पुराणांत आढळते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदा देवीला नऊ प्रकारची फुले आणि नऊ प्रकारची फळे अर्पण करतात. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवतात. 
सिद्धिदा देवीचा मंत्र असा आहे- 
सिद्ध गंधर्व यक्षादी,असुरैः अमरैरपि। 
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धदायिनी ।। 
आणि नाममंत्र असा आहे -
ओम् श्रीसिद्धिदायै नमः।' 
अशा ह्या सर्व देवगणांच्या दिव्य देहांपासून उत्पन्न झालेल्या, त्यांच्या तेजःपुंजाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या,धर्म,अर्थ,काम, मोक्ष या चार पुरुषार्थांचा लाभ जिच्यामुळे होतो, जिचे अनुपमेय सामर्थ्य वर्णन करण्यास शेषशायी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर हे देवही असमर्थ आहेत, ती भगवती चंडिका सर्व जगाचे पालन करते आणि दैत्यापासून निर्माण होणाऱ्या भयाचे निवारण करते. सर्व देवदेवता आणि महर्षींना जी पूजनीय आहे त्या आई जगदंबेला मी नमन करते. ती सर्वांचे मंगल करो.
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९

Keep reading

Books you may enjoy

View all