More Info
पुस्तकाबद्दलची माहिती
अलौकिक प्रतिभा, असामान्य बुद्धिमत्ता आणि करुणेचे प्रतीक म्हणजे ज्ञानदेवादि भावंडे. ज्ञानदेवांचे पहिले विश्वासार्ह चरित्र म्हणून ज्याकडे वारकरी संप्रदाय श्रद्धेने पाहतो, ते म्हणजे भक्तशिरोमणी नामदेव महाराजांनी लिहिलेले श्री ज्ञानदेव चरित्र. संत ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा सागर तर संत नामदेव हे भक्तीचे आगर. ज्ञानदेवांचे संपूर्ण चरित्र नामदेवांनी आदि, तीर्थावळी आणि समाधी या प्रकरणांतून सिद्ध केले आहे. जातिधर्माच्या जोखडातून समाजाला मुक्त करून भागवत धर्माच्या छत्राखाली साऱ्या संतमेळ्याला व सर्वसामान्य समाजाला एकत्र करण्याचे काम ज्ञानदेवांनी केले तर नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. या दोन महान संतांची तीर्थयात्रा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा संगमच. वारकरी संप्रदायात या चरित्राला नित्यपठणाचे स्थान आहे. या चरित्रकाराबद्दल अभ्यासकांमध्ये जे वाद आहेत, त्याविषयी अभ्यासपूर्ण चर्चा करून चरित्राचे थोरपण ठसवणारे डॉ. सदानंद मोरे देहूकर यांचे विवेचक पुस्तक - भक्तशिरोमणी नामदेव महाराज कृत संत ज्ञानदेव चरित्र (आदि, तीर्थावळी, समाधी)
लेखक डॉ. सदानंद मोरे देहूकर यांच्याबद्दल
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचा प्रसार करणारे ज्येष्ठ व तज्ज्ञ अभ्यासक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख. गर्जा महाराष्ट्र, तुकाराम दर्शन, त्रयोदशी, मंथन, सकल संत सार्थ गाथा, थोरांचे अज्ञात पैलू, समाज सुधारक, ही पुस्तके सकाळ तर्फे प्रकाशित. साहित्य अकादमीसह अन्य अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त. अनेक नामांकित संस्थांशी संबंधित.