दिवस सहावा "कात्यायनी"

By Sakal Publications · · 3 min read

दिवस सहावा "कात्यायनी"
आज नवरात्रीचा सहावा दिवस! या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करतात. देवी भागवतात कात्यायनी देवीची कथा वर्णिलेली आहे. 'कत' नावाच्या प्राचीन कुळात 'कात्यायन' नावाचे तपस्वी महर्षी होऊन गेले. कात्यायन ऋषींनी आदिशक्ती जगदंबा देवीची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांना 'तुझ्या इच्छेनुसार मी तुझ्या घरी योग्य वेळी तुझी कन्या म्हणून प्रकट होईन'  असा वर दिला. कात्यायन ऋषींना खूप आनंद झाला.

दरम्यानच्या काळात महिषासुर नावाच्या म्हैस किंवा रेड्याच्या रूपातील दानवाला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की,'त्याला कोणताही पुरुष मारू शकणार नाही.' या वराने महिषासुराने
गर्वोन्मत्त  होऊन स्वर्गावर आक्रमण केले आणि देवांना युद्धात परास्त करून स्वर्गातून हाकलून लावले. तेव्हा सर्व देवांच्या तेजांमधून एक दिव्य शक्ती निर्माण झाली हे आपण पहिल्या लेखात वाचले आहेच. ती शक्ती कात्यायन ऋषींच्या आश्रमात कन्येच्या रूपात वास्तव्यास राहिली. कात्यायनांची ती मानसकन्या म्हणून तिचे नाव 'कात्यायनी.'  कात्यायनी देवीचे वाहन सिंह असून ती दशभुजा देवी आहे. तिचे वर्णन पुढील श्लोकात असे केले आहे-

 या चण्डी मधुकैटभप्रमथिनी।
या माहिषोन्मूलिनी ।
या धूम्रेक्षण चण्डमुण्डमथिनी ।
या रक्तबीजाशनी ।
शक्तिः शुंभनिशुंभनिर्दालिनी ।
या सिद्धलक्ष्मीः  परा ।
सा दुर्गा नवकोटिमूर्तिसहिता ।
माम् पातु विश्वेश्वरी।।
या श्लोकाच्या उच्चारणाने आणि ध्यानाने भक्तांचे मन प्रसन्न होते.पुढे मग देवीने महिषासुर,
रक्तबीज,चंड, मुंड,शुंभ,निशुंभ या राक्षसांशी घोर युद्ध करून त्यांचा निःपात केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले.थोडक्यात 'कात्यायनी' हे आदिशक्ती दुर्गेचेच एक रूप आहे,जे कात्यायन ऋषींना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या आश्रमात कन्यारूपाने अवतरले.

कात्यायनी देवी संदर्भात फारशी कुणाला माहीत नसलेली भागवत पुराणातील एक कथा मला इथे उद्धृत करावीशी वाटते ती अशी- वृंदावनातील सर्व गोपींनी एकदा आपल्याला 'श्रीकृष्ण' पती प्राप्त व्हावा ह्या भोळ्या भावाने मार्गशीर्ष महिन्यात यमुनेच्या काठी कात्यायनी देवीचे व्रत केले होते.महिनाभर नियमितपणे त्या पहाटे स्नान करून कात्यायनी देवीची पूजा करीत आणि त्या वेळी जो मंत्र म्हणत तो असा- 
कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी 
नंदगोपसुतं देहि पतिं मे कुरु ते नमः।। 
कात्यायनी देवीने त्या सर्व गोपींना वर दिला पण तो ऐहिकदृष्ट्या दिलेला नाही. कारण गोपींशी कृष्णाशी असलेले नाते हे प्रापंचिक,लौकिक नव्हते तर ते आध्यात्मिक भक्ती किंवा प्रेम या सदरात मोडते.या दोन कथांच्या सारांशाचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात असे येते की दुर्गादेवी ही आवश्यकतेनुसार एकीकडे युद्धातली उग्र शक्ती होऊन दुष्टांना शासन करते आणि दुसरीकडे ती प्रेमळ, सौम्य होऊन भक्तांचे कल्याण करते. त्यांच्यावर अपार कृपाही करते.

 कात्यायनी देवीच्या कृपेमुळे, पूजनामुळे अविवाहित मुलींना उत्तम जीवनसाथी लाभतो. विवाह समस्या सुटतात. मुलींचे संसार सुखाचे होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात,म्हणूनच साखरपुडा,सीमान्तपूजन,गौरीहर पूजन या पूजाविधींमध्ये कात्यायनी देवीची पूजा केली जाते.

कात्यायनी देवीमुळे आज्ञा चक्र जागृत होते.आज्ञा चक्रात प्रत्यक्ष शिव वास करत असतात हे आपल्याला माहीत आहेच.

कात्यायनी देवीच्या पूजनाचा मंत्र आहे-
नमस्ते सर्वगे देवी,
नमस्ते शुभसौख्यदे
त्राहि माम् पद्मपत्राक्षि
कात्यायनी नमो$स्तुते ।।
आणि 'ओम् ऱ्हीं श्रीं कात्यायन्यै नमः।' हा कात्यायनी देवीचा बीज मंत्र आहे.
 कात्यायनी देवीला नारिंगी रंग आवडतो.लाल,पिवळी फुले आणि तुपाचा दिवा तिला अत्यंत प्रिय आहे. तिची षोडशोपचारी पूजा करून तिला शुद्ध मध किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ आणि तांबूल अर्पण करावा. या नवरात्रीत आपण तिला तांबूल अर्पण करताना भावस्पर्शी प्रार्थना करू या-' हे आई जगदंबे,मी तुला या तांबूलातून शांती हे विड्याचे पान, मीपणा जाळून लावलेला चुना, वासना फोडून केलेली सुपारी, भाव-श्रद्धारूपी कापूर, विवेक हा कात, वैराग्य हे जायफळ, दया ही जायपत्री, क्षमा या लवंगा, आणि सुबुद्धीरूपी वेलदोडे घातलेला हा तांबूल अर्पण करत आहे.कृपा करून माझी ही पूजा गोड मानून घे'
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९

Keep reading

Books you may enjoy

View all