दिवस चौथा "कूष्मांडा देवी"

दिवस चौथा "कूष्मांडा देवी"
आज नवरात्रीची चौथी माळ! आजच्या दिवसाची अधिपती देवता म्हणजे कूष्मांडा देवी! आपण तिची माहिती घेऊ या. देवी भागवत महापुराणात देवी मुखातून निघालेले एक महावाक्य आहे- 
'सर्वं खल्विमेवाSहम् नान्यदस्ति सनातनम्।'  
देवी म्हणते-  'अस्तित्वात असलेले सर्व काही केवळ माझेच आविष्कार आहेत. माझ्यापासून अन्य कशाचेही स्थायी अस्तित्व नाही. या दृश्य जगासह अदृश्य सूक्ष्म जगातील श्रीगणपती, विष्णु, रुद्र, सूर्यादी सर्व देवी-देवतासुद्धा या एकाच आदिशक्तीची विविध रूपे असून या असंख्य रूपांनी त्या महाशक्तीची लीला अनादि कालापासून चालू आहे व ती अखंडपणे सदैव चालत राहील.' 
आजच्या या कूष्मांडा देवीच्या नावाचा अर्थही असाच आहे की, जिने आपल्या किंचितशा(कू), तेजातून,ऊर्जेतून (उष्मा) ब्रम्हांडाचे बीज (अंडे) निर्माण केले. त्या बीजातून ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवांची उत्पत्ती केली. नंतर योगशक्तीद्वारे सृष्टी कार्यासाठी स्वतःही सरस्वती (ब्रह्मशक्ती,कार्य-उत्पत्ती), लक्ष्मी (विष्णुशक्ती,कार्य- स्थिती) काली(रुद्रशक्ती, कार्य-लय)अशी तीन रूपे धारण केली.जेव्हा सृष्टी अस्तित्वात नव्हती, पृथ्वी,आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतेही अस्तित्वात नव्हती, ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवही अस्तित्वात नव्हते. सर्वत्र केवळ अंधार आणि अंधारच होता, तेव्हा 'आदिशक्ती' प्रकट झाली. हेच देवीचे कूष्मांडा रूप. अखिल ब्रह्मांडाची ही जननी, जन्मदात्री!

'कूष्मांड' या शब्दाचा अर्थ आहे कोहळा. देवीच्या उदराला कोहाळ्याची उपमा दिली आहे. सर्व भक्तांचे अपराध पोटात सामावून घेणारी अशी ती कूष्मांडा!असाही एक अर्थ सांगितला जातो.

कूष्मांडादेवी ही अष्टभुजा आहे. तिच्या आठ हातांमध्ये कमळ, चक्र,गदा,कमंडलू,धनुष्य-बाण, जपमाला आणि अमृतकलश या वस्तू आहेत. तिची कांती अत्यंत प्रकाशमान आणि तेजस्वी आहे. कूष्मांडा देवीला केशरी रंग आवडतो. केशरी झेंडूची फुले, जास्वंद, केशरी गुलाब तिला अत्यंत प्रिय आहेत. नैवेद्यासाठी कोहाळ्याचा पेठा किंवा हलवा, कोहाळ्याचे घारगे, मालपुवा हे पदार्थ तिला खूप आवडतात. देवीला दुर्गेच्या ३२ नावांनी(श्रीदुर्गा द्वात्रिंशन्नाममाला स्तोत्राने) अभिषेक करून तिची षोडशोपचारी पूजा करावी. तिच्या पूजेचा ध्यानमंत्र असा आहे -
'सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च । 
दधानां हस्तपद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तु मे।। 

नाममंत्र असा आहे-श्रीकूष्मांडा देव्यै नमः।'

कूष्मांडा देवीच्या उपासनेने अनाहत चक्राची शुद्धी होते. तिच्या कृपेने मनात प्रेम,दया,करुणा हे रस उत्पन्न होतात.भारतात वाराणसी आणि कानपूर या दोन ठिकाणी कूष्मांडा देवीची मंदिरे आहेत.

कूष्मांडा  ही देवी आरोग्यदात्री, दीर्घायुष्य देणारी, सर्व दुःख- क्लेश-रोग-शोकांपासून मुक्त करून सुख-समृद्धी देणारी देवी आहे. कूष्मांडा देवीच्या पूजनाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शुभ शक्ती निर्माण होते. शक्ती मधील 'श' हा ऐश्वर्यवाचक शब्द असून 'क्ती' चा अर्थ पराक्रम असा आहे. ऐश्वर्य आणि पराक्रम देणारी ही शक्तिदेवता आहे. भगवंताच्या शक्तीचा अर्थ ईश्वराला प्रेरणा देणारी, ईश्वराचे कार्य करणारी, ईश्वराशी ऐक्यस्वरूप असणारी व उपासकाला सर्व प्रकारचे ऐश्वर्य, भोग अनायासे प्राप्त करून देऊन अंती परब्रह्मापर्यंत पोहोचवणारी असा आहे.

शक्तीची उपासना ही दिव्य उपासना आहे. धर्म,अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती या उपासनेने होते. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला प्रगत विकसित व्हायचे असेल तर शक्ती उपासनेला पर्याय नाही.श्रीजगदंब कृपेने आपणां सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत,ही तिच्या चरणी प्रार्थना!
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९