दिवस पहिला "शैलपुत्री"

By Sakal Publications · · 3 min read

दिवस पहिला "शैलपुत्री"
आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होत आहे.वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने येत्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या 'नवदुर्गा' रूपांचा परिचय आपण करून घेणार आहोत. धनसंपत्ती,ऐश्वर्य प्राप्त करून देणारी लक्ष्मी, ज्ञान- बुद्धीचे वैभव देणारी सरस्वती, विश्वाचे भरण-पोषण करणारी विश्वंभरा, मंगलत्वाचे साम्राज्य निर्माण करणारी मंगळागौर, अन्नधान्याची समृद्धी देणारी श्रीगणेशाबरोबरची गौरी, संकटांपासून रक्षण करणारी दुर्गा, संहारशक्ती आणि पराक्रमाची देवता काली, अन्नाने तृप्त करणारी अन्नपूर्णा, सूर्याप्रमाणे तेजःपुंज बनवणारी गायत्री, बहुविध औषधी गुणांनी युक्त तुलसी, निसर्गाशी सान्निध्य साधलेली चैत्रगौर, भूप्रदेश सुपीक करणाऱ्या पवित्र सरिता, गोमाता सुरभी, भाग्यदात्री षष्ठीदेवता, दीर्घायुष्य व आरोग्य देणारी जीवंतिका, क्षमाशील धरित्री, ज्ञानामृत पाजणारी भगवद्गीता, आणि स्वातंत्र्यलक्ष्मी भारतमाता, देवींच्या ह्या विविध रूपांचे पूजन वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याकडे सतत सुरू असते.

         आज 'शैलपुत्री' या दुर्गेच्या पहिल्या स्वरूपाबद्दल जाणून घेऊ या. नवरात्रीच्या प्रथम दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन करावे असा संकेत आहे.'शैल' या शब्दाचा अर्थ 'पर्वत' असा आहे, तर पुत्री म्हणजे मुलगी. हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आलेली म्हणून तिचे नाव 'शैलपुत्री'.जरी ही सर्वांची अधीश्वरी आहे,तरी हिमालयाने केलेल्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन कृपापूर्वक त्याच्या कन्येच्या रूपात प्रकट झालेली ही देवी आहे.

            शिवपत्नी पार्वती ही ब्रह्मदेवाचा पुत्र असलेल्या दक्ष प्रजापतीची पूर्वजन्मातली कन्या. पूर्वजन्मी पार्वतीचे नाव 'दाक्षायणी' असे होते.एकदा दक्षाने महायज्ञ केला होता. त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवतांना आग्रहाची निमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शंकरांना निमंत्रण दिले नाही. पितृगृही महायज्ञ असल्याचे कळताच दाक्षायणीला आई-वडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली.आमंत्रण नसूनही यज्ञासाठी माहेरी जाण्याचा तिचा मानस पाहून शिवशंकराने तिला दुखावले नाही, पण काहीतरी अघटित घडणार असल्याचा तिला संकेत दिला. त्याकडे दुर्लक्ष करून दाक्षायणी माहेरी आली खरी, पण तिथे तिला एकट्या महेश्वराला वगळून आपल्या पित्याने अन्य सर्व देवांना पाचारण केल्याचे दिसले. आपल्याच पित्याने आपल्या पतीची मानहानी,अप्रतिष्ठा केली, हे दाक्षायणीला सहन झाले नाही. तिने उग्र रूप धारण करून अचानक प्रज्वलित यज्ञकुंडात आपला देह झोकून दिला. सर्वत्र हाहाकार होऊन विनाशकारी युद्ध झाले, दक्षयज्ञाचा आणि त्याचाही विध्वंस झाला. तेव्हापासून दाक्षायणीचे नाव 'सती' असे झाले.

काही काळानंतर सतीने हिमवान आणि मैनावती या दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. या जन्मात कठोर तपःसामर्थ्याने तिने पुन्हा एकदा शिवाला प्राप्त करून घेतले.

 शैलपुत्रीचे रूप अतिशय तेजस्वी, सुंदर, शांत आणि सौम्य आहे. पर्वतकन्या असल्यामुळे निसर्गाशी तिचे जवळचे आणि विशेष असे नाते आहे. तिचे वाहन वृषभ(बैल,नंदी) हे आहे,म्हणूनच श्रीदुर्गा सप्तशतीत  तिला 'वृषारुढा'असे म्हटले आहे. शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूल, तर डाव्या हातात कमळाचे फूल आहे शैलपुत्रीच्या उपासनेसाठी जो श्लोक सांगितला जातो तो असा-
'वन्दे वांच्छितलाभाय चन्द्रार्ध कृत शेखराम् । 
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।।' 
आणि नाममंत्र असा आहे- 
'ओम् श्री शैलपुत्रीदेव्यै नमः।' 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करताना शैलपुत्री देवीला आवडणाऱ्या फिकट पिवळ्या किंवा चंदेरी पांढऱ्या रंगाची साडी नेसवावी. हे दोन्ही रंग तेज, पावित्र्य, शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहेत. देवीची देवी अथर्वशीर्षाने अभिषेक करून षोडशोपचारी पूजा करावी. पिवळीआणि शुभ्र,सुगंधी फुले अर्पण करावीत.गायीच्या शुद्ध तुपात तयार केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य समर्पित करावा. नवरात्रीतली ही पहिल्या दिवसाची पूजा ही मूलाधार चक्राच्या साधनेचे व तीतून होणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीचे पहिले पाऊल मानले जाते.
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९

Keep reading

Books you may enjoy

View all