दिवस तिसरा "चंद्रघंटा"

By Sakal Publications · · 3 min read

दिवस तिसरा "चंद्रघंटा"

नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस! तिसऱ्या दिवशी 'चंद्रघंटा' देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे.कालच्या कथेनुसार शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाल्यानंतर ती दोघे अतिशय आनंदाने कैलासावर मार्गक्रमणा करू लागली.त्याच बरोबर दुसरीकडे कालक्रमानुसार विश्वात अनेक घटना घडत होत्या. त्यांपैकी एक घटना म्हणजे देव- दानवांच्या अखंड १०० वर्षे सुरू असलेल्या घनघोर रणसंग्रामात देवसेना पराजित होऊन महिषासुर नावाचा राक्षस देवाधिपती इंद्र बनला. अर्थातच दानवी स्वभावानुसार त्याने संपूर्ण त्रैलोक्याला 'त्राहि भगवान् ' करून सोडले.तेव्हा सगळे पराभूत देव प्रजापती ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली भगवान विष्णू आणि शिव यांना भेटायला गेले. महिषासुराच्या अत्याचारांचा सगळा वृत्तांत त्यांनी त्या दोघांना सांगितला. तेव्हा अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या श्रीविष्णूंच्या मुखातून एक महान तेज प्रकट झाले. त्यानंतर महादेव, ब्रह्मदेव, इंद्र आणि इतरही देवांच्या देहातून तेज निर्माण होऊन ते सगळे तेज परस्परांत विलीन झाले. या सगळ्यांचा तो तेजोनिधी एखाद्या ज्वलंत पर्वताप्रमाणे भासत होता. त्या अतुलनीय, देदीप्यमान तेजातून एक नारीरूप आविष्कृत झाले. त्या देवीलाच 'महालक्ष्मी', 'अपराजिता' किंवा 'दुर्गा' असे संबोधले गेले. सगळ्या देवांनी त्या देवीला आपापली शस्त्रास्त्रेही दिली. विष्णूंनी चक्र, शंकरांनी त्रिशूल, वरूणाने शंख, अग्नीने शक्ती, चंद्राने मुकुट आणि सहस्राक्ष देवेंद्रांनी गजराज ऐरावताच्या गळ्यातील घंटा इत्यादी अनेक शस्त्रास्त्रे देवीला दिली. पार्वती ही शिवपत्नी असल्यामुळे भगवान शंकरांप्रमाणे तिच्या भाळीही अर्धचंद्र विलसित असतोच,त्यात भर म्हणून चंद्राने दिलेल्या मुकुटावर इंद्राने दिलेली घंटा झळकत होती. म्हणून 'चंद्रघंटा' हे नाव तिला देण्यात आले.आल्हादकारी चंद्रमा जिच्या घंटेमध्ये स्थित आहे,ती चंद्रघंटा!तिने दश भुजांमध्ये दहा शस्त्रे घेऊन, सिंहावर आरुढ होऊन नऊ दिवस महिषासुराशी व त्याच्या सैन्याशी घनघोर युद्ध केले.तोच हा नवरात्रीचा काळ! या युद्धात तिच्या मस्तकावरील घंटानादाने सर्वत्र भयावह वातावरण निर्माण होत असे. अखेरीस नवव्या दिवशी महिषासुराचा वध झाला आणि त्रैलोक्य निर्भय झाले.

चंद्रघंटा देवीचे शरीर अत्यंत तेजस्वी, सुवर्णकांतियुक्त असे आहे.सिंह हे वाहन असून तिला दशभुजा आहेत. तिच्या नऊ हातांमध्ये त्रिशूल, तलवार, गदा, धनुष्यबाण, कमळ, परशु, वज्र, घंटा आणि सुदर्शनचक्र ही आयुधे आहेत आणि एका हाताने ती भक्तांना अभय व कृपाशीर्वाद देते.

तिच्या उपासनेसाठी  श्लोक असा आहे -

' पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्र कैर्युता। 
प्रसीद तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता।' 
आणि नाममंत्र असा आहे- ओम् श्रीचंद्रघंटा देव्यै नमः ।' 

चंद्रघंटा देवीच्या उपासनेने मणिपूर चक्र जागृत होते. चंद्रघण्टा देवीला सोनेरी रंग अतिशय प्रिय आहे. पिवळी किंवा लाल रंगाची गुलाबाची फुले तिला आवडतात. दूध, दुधापासून तयार केलेले पदार्थ उदा. खीर इ. तिला आवडतात. श्रीसूक्ताने अभिषेक करून तिची षोडशोपचारी पूजा करावी. कुंकुमार्चन करावे. तसे तर नवरात्रीत रोजच कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चनासाठी देवीची १०८ नावे, १००० नावे, श्रीसूक्त किंवा ललिता सहस्रनामावलीतील एक हजार नावे यांचा अवश्य उपयोग करावा.

वरील कथेतून आपल्या लक्षात   येते ते असे की, जेव्हा सगळे देव एकेकटे स्वतंत्रपणे लढत होते, तेव्हा त्यांचा राक्षसांकडून पराभव होत होता. पण जेव्हा ते सगळे देव एकत्र आले, त्यांचे तेज जेव्हा एकवटले, तेव्हा त्यांची ही एकत्र झालेली समष्टी शक्ती! या शक्तीने तामसी शक्तीवर विजय मिळवला आणि राक्षसांचा वध झाला. सांप्रत काळातही समाजातील बदलत्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना योग्य पद्धतीने करायचा असेल तर आपण सगळ्यांनी संघटित होणे, एकत्रित राहणे गरजेचे आहे. या सगळ्या पौराणिक, धार्मिक कथा असल्या तरी आपल्याला मोलाचा संदेश त्या देत असतात. त्या कथांकडे पाहण्याचा आपल्या दृष्टिकोन मात्र पण बदलला पाहिजे.समाज संघटित होऊन वातावरण निर्भय,आनंदी होवो ही श्रीजगदंबे चरणी मन:पूर्वक प्रार्थना!
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९

Keep reading

Books you may enjoy

View all