मुलं, सोशल मीडिया आणि डेटा : मेटाच्या तडजोडीची दुसरी बाजू | Children, Social Media and Data: The Other Side of Meta’s Settlement

मुलं, सोशल मीडिया आणि डेटा : मेटाच्या तडजोडीची दुसरी बाजू   | Children, Social Media and Data: The Other Side of Meta’s Settlement

मेटा विरुद्धचा ऐतिहासिक खटला शेवटी काही नवीन फिचर्स आणि सुमारे १.५ लाख कोटी रुपयांच्या तडजोडीवर संपला आहे. मेटा मधल्या अधिकाऱ्यांना इंस्टाग्राम मुलांबरोबर काय करतंय हे माहित असून त्यांनी जाणीवपूर्वक नफेखोरीसाठी ते होऊ दिलं. 
मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा खेळ केला. मुलांना इंटरनेटचे व्यसन लागू दिले. 
आता नवीन फिचर्स येता आहेत. 
१) २ तासांची मर्यादा: किशोरवयीन मुले दिवसातून फक्त २ तास मेटा ॲप्स वापरू शकतील.
२) नाईट मोड लॉकआउट: मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत मुख्य ॲप्स पूर्णपणे ब्लॉक राहतील (पालकांच्या संमतीशिवाय ते उघडणार नाहीत).
३) स्कूल मोड: शाळेच्या वेळेत (weekday hours) सर्व नोटिफिकेशन्स म्यूट/बंद राहतील.
४) 'लाईक्स' संख्या लपणार व फिल्टर बंदी: मुलांच्या पोस्टवरील लाईक्सची संख्या कोणालाही दिसणार नाही. तसेच मानसिक आरोग्याला हानी पोहोचवणारे ब्युटी फिल्टर्स हटवले जातील.
५) १३ वर्षांखालील मुलांवर कडक नजर: वय लपवून ॲप वापरणाऱ्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी कडक 'Age Verification' यंत्रणा उभारली जाईल.


 तसंच मेटा ने हेही स्पष्ट केले आहे की, या सेटलमेंट मधली ३०% रक्कम मेटा तेव्हाच देईल, जेव्हा TikTok आणि YouTube देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर हेच नियम लागू करतील. ही फिचर्स लागू करण्यासाठी मेटाला अमेरिकेत ६ ते १२ महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. आपल्यासाठी तो दोन एक वर्षांचा ही असू शकतो. तोवर मुलं धोक्यात आहेत हे लक्षात घ्या. 


 भारतासारख्या देशात जिथे अनेक मुलं स्वतःचे खोटे वय सांगून या प्लॅटफॉर्मवर जातात. जिथे पालक माध्यम साक्षर आणि जागरूक नाहीत, तिथे ही फिचर्स आणली तरी त्याचा उपयोग होईल का याबाबत शंका आहे. मुळात age verification करणार कसं? Roblox सारखी apps सरळ मुलांचे face scans करता आहेत age verification च्या नावाखाली. म्हणजे लहान मुलांचा प्रचंड मोठा बायोमेट्रिक डेटा ह्या कंपन्या सर्रास गोळा करता आहेत. त्याचा उद्या कसा वापर होईल काहीही सांगता येत नाही. यात आपले सरकार काहीही करत नाहीये. मुलांच्या वैयक्तिक डेटामागे सगळे आहेत हे लक्षात घ्या. सावध असायला हवे. 
 
मुक्ता चैतन्य