दिवस दुसरा "ब्रह्मचारिणी"

By Sakal Publications · · 3 min read

दिवस दुसरा  "ब्रह्मचारिणी"
आज नवरात्रीची दुसरी माळ! ब्रह्मचारिणी स्वरूप समजून घेऊ.  ब्रह्मदेवांची शक्ती सरस्वती, विष्णूंची शक्ती लक्ष्मी आणि रुद्रांची शक्ती काली या अनुक्रमे सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि संहाराच्या शक्ती आहेत. सरस्वती आपल्याला ज्ञान, विद्या, कला, कर्मांमधील कौशल्य, वाणीची शुद्धी, वैचारिक परिपक्वता, विवेक, सद्बुद्धी, सुयश, कीर्ती, सर्जनशीलता, परिपूर्णता या सगळ्या गुणवत्तापूर्ण गोष्टी देते. लक्ष्मी आपल्याला समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य, सौंदर्य, वैभव, संतती, प्रेम, आरोग्य, वाहनसौख्य म्हणजे एकूणच ऐहिक सुख आपण ज्याला म्हणतो, ते सर्व उपभोग आणि सौख्य देत असते.काली शक्ती आपल्याला पराक्रम, शक्ती, कर्तृत्व,आत्मविश्वास, निर्भयता, उत्साह हे सगळे लढाऊ गुण देत असते. सरस्वती सत्त्वगुणी, लक्ष्मी रजोगुणी तर काली तमोगुणी आहे. जीवन उत्तम रीतीने व्यतीत करण्यासाठी वर उल्लेखिलेल्या सगळ्या गुणांची आणि गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते, पण त्याहूनही अधिक आवश्यकता आपल्याला आहे ती तपःसामर्थ्य, संयम आणि त्याग ह्या तीन गुणांची! आपण देवी भागवत किंवा दुर्गा सप्तशती वाचली असेल तर आपल्याला आढळेल की देव, देवी  किंबहुना राक्षसही आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रचंड तपःसाधना करीत असत.आणि नेमकी हीच गोष्ट आज समाज विसरलेला आहे.पूर्वी घरोघरी नित्य उपासना होत असे. आज उपासना पूर्णपणे बंद झाल्यामुळे समाजामध्ये जी एक नकारात्मकता पसरली आहे, तिच्यामुळे मन खिन्न होते.

       आजचे आपण पाहात असलेले देवीचे 'ब्रह्मचारिणी' हे रूप हे तपस्विनीरूप आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे. ब्रह्मचारिणी या शब्दातील ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे-सत्य! आणि  त्या सत्याची  किंवा त्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी करावे लागते,ते तप!आणि चारिणी शब्दाचा अर्थ आहे- आचरण करणारी, तसे वागणारी. सत्याच्या शोधासाठी तपःसाधना करणारी ती ब्रह्मचारिणी. 

ही देवी तपस्विनी असल्याने तिच्या शांत अशा मुखमंडलावर तपाचे असीम तेज विराजलेले दिसते. ही देवी सदैव ध्यानस्थ असते आणि तिच्या उजव्या हातात जपमाळ दिसते. डाव्या हातात शुद्धतेचा भाव दर्शवणारा कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी ही शुभ्र वसनधारिणी आहे. कठोर तपस्वी जसा आपल्या पायात पादत्राणे घालत नाही, तसेच ब्रह्मचारिणीनेही ती घातलेली नाहीत.

ध्येयप्राप्तीसाठी आत्मसंयम, प्रचंड श्रद्धा, आणि कमालीचे श्रम या गुणांची आवश्यकता असते, आणि हे सगळे गुण पार्वतीकडे आहेत. ब्रह्मचारिणी म्हणजेही पार्वतीच. आपल्या वडिलांच्या भव्य प्रासादाचा, ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करून शेकडो वर्षे केवळ कंदमुळे आणि फळे खाऊन ती राहिली होती. नंतरची काही वर्षे केवळ पाने खाऊन तिने साधना  केलेली आहे आणि तपःसीमेच्या अंती पानेही न खाता राहून कठीण तपस्या केलेले तिचे रूप आपल्या ऐकण्यात आहे. त्यामुळेच तिचे नाव 'अपर्णा' असे झाले आहे. ऊन, वादळ, पाऊस, थंडी या कशाचीही तमा न बाळगता  तिने तपाचरण केले होते म्हणूनच तिला 'ब्रह्मचारिणी' हे नाव मिळाले.

          एवढ्या तपानंतरही भगवान शिवशंकराने साधुरूपात येऊन तिची परीक्षा घेतली. स्वतःच स्वतःची निंदा करून पार्वतीला डिवचण्याचे काम त्यांनी केले, तेव्हा क्रोधावेशात पार्वतीने त्यांना सुनावले की, 'तुम्ही माझ्या आराध्यदैवताची निंदा करून मला विचलित करू शकत नाही. माझ्या निश्चयापासून मी कदापिही ढळणार नाही.' पार्वतीचे ते तेज, तो दृढ निश्चय आणि आपल्यावरील प्रेमाने, निष्ठेने भगवान शिव भारावून गेले आणि त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
     ब्रह्मचारिणीच्या उपासनेसाठी मंत्र असा आहे-
'दधानां कर पद्माभ्याम् अक्षमाला कमंडलु। 
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिणी अनुत्तमा ।।'  
नाममंत्र आहे- 'ओम् श्री ब्रह्मचारिणी देव्यै नमः।' 
आपण स्वतःही  शुभ्र वस्त्र धारण करून, देवीलाही शुभ्र वस्त्र नेसवून 'देवी अष्टोत्तरशतनाम स्तोत्राने' अभिषेक करवून तिची षोडशोपचारी पूजा करून, सुगंधी शीतल चंदनगंध लावून,शुभ्र सुगंधी फुले वाहून, धूप-दीप ओवाळून शर्करामिश्रित गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा.

सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करवून देणे, हा जिचा स्वभाव आहे, ती ब्रह्मचारिणी! ब्रम्हचारिणीच्या उपासनेने आपल्यामध्ये आत्मसंयम, अविचल धैर्य, स्थैर्य, शांती, प्रचंड निष्ठा, इच्छाशक्ती,त्याग, तप करण्याची इच्छा,मानसिक समाधान,ज्ञान,एकाग्रता या सद्गुणांची वाढ होवो.आपले मानसिक ताण-तणाव,चिंता दूर होवोत.आपले आत्मसामर्थ्य वृद्धिंगत होवो. आपल्यातील स्वाधिष्ठान चक्राची जागृती होऊन सर्जनशीलता वाढो. पारमार्थिक उत्कर्ष होवो.कार्यसिद्धी होऊन जयप्राप्ती होवो. ही श्रीब्रह्मचारिणी देवीचरणी मन:पूर्वक प्रार्थना!
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९

Keep reading

Books you may enjoy

View all