दिवस पाचवा "स्कन्दमाता"

By Sakal Publications · · 3 min read

दिवस पाचवा "स्कन्दमाता"
आज नवरात्रीची पाचवी माळ! आजच्या दिवशी 'स्कन्दमाता' या पाचव्या रूपाची पूजा करण्याची पद्धत आहे. छान्दोग्य श्रुतीनुसार शिव-पार्वतीच्या शक्तीपासून उत्पन्न झालेल्या सनत्कुमाराचे नाव 'स्कन्द' असे आहे. स्कन्द म्हणजे कार्तिकेय, षडानन, कुमार,मुरुगन,गणपतीचा मोठा भाऊ! या स्कन्दाची माता म्हणून पार्वतीला 'स्कन्दमाता' असे म्हणतात.

 तारकासुर हा राक्षस वज्रांग आणि वज्रांगी यांचा मुलगा. त्याच्या मनात सर्व देव-देवतांविषयी प्रचंड राग होता. अजेय होण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांसाठी घोर तप केले. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तारकासुराला अमरत्वाचे वरदान मागण्यास सांगितले, परंतु, तारकासुराला माहीत होते की, मृत्यू तर जन्माला आलेल्या प्रत्येकाचाच होतो, हे शाश्वत सत्य आहे,म्हणून त्याने चातुर्याने असा वर मागितला की, त्याचा मृत्यू केवळ भगवान शंकरांच्या स्वतःच्या पुत्राकडूनच व्हावा. कारण त्याला हेही माहीत होते की, सतीच्या मृत्यूमुळे झालेल्या वियोगाने शिव कायमस्वरूपी गहन समाधीमध्ये विलीन झाले आहेत आणि आता काही त्यांना पुत्र होणे शक्य नाही.ब्रम्हदेवाने  तारकासुराला हवा तो वर देऊन टाकला. देवाकडून एखादा वर मिळाला की राक्षस त्यांच्या स्वभावानुसार उन्मत्त होऊन त्रैलोक्यातील देव,मानव या सत्त्वशक्तींना भयंकर त्रास देणार हे तर निश्चित आहे. तारकासुरही त्याला अपवाद नव्हताच. त्याने देव-देवता,ऋषी-मुनी यांना छळून सगळीकडे अधर्म माजवला.

       तारकासुराच्या अत्याचारांनी त्रासलेले सगळे देव ब्रह्मदेव आणि विष्णूंकडे आले. या दोन देवांच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवप्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप आरंभले. त्यामुळे यथावकाश शिव-पार्वतींचा विवाह होऊन कार्तिकेयाचा जन्म झाला. कार्तिकेय बालवयापासूनच अतिशय शूर आणि पराक्रमी होता, म्हणून त्याला देवांचा सेनापती केले गेले.कालांतराने देव-दानवांचा महासंग्राम झाला आणि कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला. या युद्धात पार्वती स्कन्दासोबत सोबत होती.

ज्यावेळी देवी पार्वती स्कन्दाला स्वतःच्या मांडीवर घेऊन मातारूपात प्रकट झाली, तेव्हापासून तिला स्कन्दमाता या नावाने संबोधले जाऊ लागले. स्कन्दमातेची कांती शुभ्र गौर वर्णाची असून तिच्या एका हातात कमलपुष्प असते. एक हात वरद मुद्रा दर्शवतो,आणि उरलेल्या दोन्ही हातांनी कार्तिकेयाला कुशीत व मांडीवर घेऊन ती कमलासनावर बसली आहे. कमलासनावर बसल्यामुळे तिला 'पद्मासनादेवी' असेही म्हटले जाते. तिची षोडशोपचारी पूजा करून पूजेच्या वेळी पुढील मंत्र म्हटला जातो-
'सिंहासनगता नित्यम् पद्माश्रित दिव्य नेत्रा । 
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ।। 
आणि नाममंत्र असा आहे- 
ओम् श्रीस्कन्दमातायै नमः। 
पूजेनंतर तिला कमळ अर्पण करावे.केळ्याचा नैवेद्य दाखवावा.  स्कन्दमातेच्या पूजनाने संतती प्राप्ती होते,संततीचे कल्याण व रक्षण होते. विशुद्ध चक्राची शुद्धी होते तसेच आपल्या जन्मकुंडलीतील बुध ग्रहाचे अशुभत्व नाहीसे होते.

पाचवा दिवस हा ललितादेवीच्या पूजनासाठीही महत्त्वाचा आहे. ललिता त्रिशती किंवा ललिता सहस्रनामाचे पठण करून या दिवशी कुंकुमार्चन केले जाते.तसेच या दिवशी कुमारी पूजनही करणे महत्त्वाचे मानले आहे. ललितादेवीची कथाही खूप सुंदर आहे.कामदेवाने शंकराच्या साधनेचा भंग केला म्हणून शंकराने त्याला जाळून टाकले. त्या राखेतून भंडासुर नावाचा राक्षस तयार झाला. त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवून देवांना पराभूत केले.या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व देवांनी मिळून एक मोठा यज्ञ केला. त्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले.त्या चक्राच्या मध्यभागी जी एक दिव्य देहधारी देवी प्रकट झाली, तीच मणिद्वीपात राहात असलेली श्रीललिता त्रिपुरसुंदरी ! तिच्या चार हातांमध्ये ऊसाचा धनुष्य फुलांचे पंचबाण, पाश आणि अंकुश ही आयुधे होती. खास केवळ स्त्रियांचे असलेले असे तिचे सैन्य होते.यथावकाश ललितादेवीने भंडासुराला ठार मारून विश्वात शांतीचे साम्राज्य निर्माण केले. पृथ्वी,आप,तेज,वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे रूप असलेली ही देवी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजातून उत्पन्न झाली आहे.या दिवशी श्रीयंत्राच्या पूजेचे पण विशेष महत्त्व आहे.लाल साडी,लाल फुले,अत्तर,
आरसा,बांगड्या, नारळ,खडीसाखर या वस्तू ललितादेवीला अतिशय प्रिय आहेत.अशा तऱ्हेने देवी उपासकांनी पाचव्या दिवशी ललितादेवी आणि स्कन्दमाता देवी यांचे पूजन करून सुखी व्हावे.
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर  
९८२४८८०७८९

Keep reading

Books you may enjoy

View all